जळगाव- दुष्काळ, पावसाचा लहरीपणा तसेच इतर नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने 50 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमळनेर येथे केला. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यापासून सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही यात्रा अमळनेर शहरात दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
महाजनादेश यात्रा अमळनेर शहरात दाखल अमळनेरात मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अमळनेर ही साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत झालेले माझे जंगी स्वागत मी आयुष्यभर स्मरणात ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार आम्ही लोकांचा जनादेश जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असो, ओबीसींचे प्रश्न असो किंवा शेतकरी, कष्टकरी लोकांचे प्रश्न असोत; भाजपने सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, असा दावा करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय मार्गी लावला -
आमच्या भाजप सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न देखील तत्काळ मार्गी लावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा विषय हाती घेऊन तो मार्गी लावला. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आमच्या सरकारने 3200 कोटी रुपयांची जमीन दिली. आता स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.