जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दोन जागांवर शिवसेनेने तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून सर्व जागा लढवण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. दरम्यान, निवडून आलेल्या उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र 8 नोव्हेंबर रोजी माघारीनंतर होणार आहे.
'हे' उमेदवार आलेत निवडून -
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मुदत आज (दि. 18) होती. दुपारी 3 वाजेपर्यंत विहीत मुदतीत जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा आणि एरंडोल या तालुक्यातील विकास सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मुरलीधर पवार, शिवसेनेचे आमदार चिमणराव रुपचंद पाटील आणि त्यांचे चिरंजीव तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा 8 नोव्हेंबर रोजी माघारीच्या प्रक्रियेनंतर होणार आहे.
महाविकास आघाडीला मोठे यश
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 3 महिन्यांपासून सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस अशा सर्वपक्षीय नेत्यांचा खल सुरू होता. सुरुवातीच्या 3 बैठकांमध्ये जागा वाटपाचे सूत्रही ठरले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात चारही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने सर्वपक्षीय पॅनलचा विषय बारगळला. चारही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धरणगाव, पारोळा आणि एरंडोल विकास सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी एकच अर्ज आल्याने तेथील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांना केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. महाविकास आघाडीने पहिल्याच प्रयत्नात 3 जागांवर यश मिळवले असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 तर शिवसेनेला 2 जागांवर यश आले आहे.