जळगाव-काँग्रेस पक्ष नेतृत्त्वहीन नाही. सोनिया गांधी यांच्या पदराआड बसून, कोणतेही पद न घेता राहुल गांधी हे काँग्रेस चालवत आहेत. अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केली. ते माध्यमांशी बोलत होते.
श्री रामजन्मभूमी निधी समर्पण अभियानाअंतर्गत मंगळवारी रात्री जळगावात 'राष्ट्रमंदिर उभारणी टॉक शो'चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नवीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती व भाजपातील गळती आदी विषयांवर भाजपची भूमिका मांडली.
हेही वाचा-सर्व बोर्डाच्या परिक्षा घेण्यास मुंबई पालिका आयुक्तांची परवानगी
राहुल गांधी हेच काँग्रेसचे नेतृत्त्व करणार-
सध्या काँग्रेसच्या नेतृत्त्वासंदर्भात चर्चा सुरू आहे, यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आपले मत केले. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी हे कोणतेही पद न घेता काँग्रेस चालवत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या गादीवर कोण दुसरी व्यक्ती येऊन बसते? हाच काय तो मुद्दा आहे. शेवटी राहुल गांधी हेच काँग्रेस चालवणार आहेत. मग ते अध्यक्ष झाले तरी किंवा नाही झाले तरी, असे भंडारी यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनावरील लस उद्या येणार; मुंबई, जालन्यात १६ जानेवारीपासून लसीकरण
हा तर न्यायालयीन प्रक्रियेचा भाग-
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. सुनावणीत अंतिम निर्णय देईपर्यंत स्थगिती देणे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. अशी स्थगिती अनेक प्रकरणांमध्ये दिली जाते, असेही माधव भंडारी यांनी सांगितले. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन हे मर्यादित भागात व मर्यादित लोकांचे आहे. संपूर्ण देशातील शेतकरीवर्गाला या कायद्यांची उपयुक्तता कळाली आहे, असा त्यांनी दावा केला.
दरम्यान, भाजपला कुठेही गळती लागलेली नाही. जे पक्षातून दुसरीकडे गेले होते ते स्वगृही परतत आहेत. पक्षात परत येणाऱ्यांची यादी मोठी असू शकते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.