जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या गोराडखेडा येथे परजिल्ह्यातील एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विषप्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यातील गोराडखेडा येथील घटना - जळगाव प्रेमीयुगुलाची आत्महत्या
उमेश हरी शेळके (वय 35) आणि पिंकी (पूर्ण नाव माहिती नाही, वय 30) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे असून दोघेही औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
उमेश हरी शेळके (वय 35) आणि पिंकी (पूर्ण नाव माहिती नाही, वय 30) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे असून दोघेही औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना गोराडखेडा येथील पी.जे. रेल्वे गेटपासून मोठ्या रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर शंभर मीटर अंतरावर घडली आहे. प्रेमीयुगुलाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर गोराडखेडा येथील पोलीस पाटलाने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा होत्या. मृतदेहांच्या बाजुलाच कीटकनाशकाचा डब्बा व प्लास्टिकचे डिस्पोजल ग्लास पडलेले होते. मृत तरुणाच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रांवरून पोलिसांना त्यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळाली. त्या तरुणाची नातेवाईक असलेली एक महिला पाचोरा शहरात राहते. तिच्याशी संपर्क करून पोलिसांनी दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, या घटनेतील मृत तरुण हा विवाहित होता. शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करत होता. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दोन्ही मृतांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.