जळगाव - गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दमदार पावसामुळे नद्या, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असले तरी अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कडधान्य पिकांच्या लागवडीखालील हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने प्रभावित झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेल्याने शेतकरीराजा हतबल झाला आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी; आतापर्यंत १०१ टक्के पावसाची नोंद
जळगाव जिल्ह्यात यावर्षी दीड महिने उशिराने पाऊस दाखल झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी काही काळ सोडला तर सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसाचा फटका उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांना बसला आहे. कडधान्य पिकांच्या फुलधारणेवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावली. त्यामुळे फळधारणेवर परिणाम झाला. उडीद, सोयाबीन शेंगांवर कीडरोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. काही ठिकाणी शेंगा बारीक होत्या. पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांन उडीद आणि मुगाची काढणी करता आलेली नाही. झाडांवरील शेंगा आता कुजत चालल्या आहेत. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके जळाली आहेत.
हेही वाचा - उल्लेखनीय..! बोंड अळीच्या नियंत्रणासाठी नांदेडमधील शेतकऱ्याचा आगळा प्रयोग