जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱयांसमोर जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. पाऊस लांबल्यामुळे शासनाने निदान चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.
जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरड्या चाऱ्याच्या 100 पेंढ्यांसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता पैसे देऊनही चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत जनावरे सांभाळणे कठीण झाले असून इच्छा नसताना शेतकऱयांना जनावरे विकावी लागत आहेत.