महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्हा रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन प्लांट लवकरच होणार कार्यान्वित - जळगाव ऑक्सिजन प्लांट

कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जळगाव जिल्हा रुग्णालयात अर्थात कोविड रुग्णालयात 21 किलोमीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कंपनीला प्लांट उभारणीचे काम देण्यात आले असून, लवकरच हा प्लांट कार्यान्वित होणार आहे.

Liquid Oxygen Plant
लिक्विड ऑक्सिजन प्लांट

By

Published : Dec 19, 2020, 4:29 PM IST

Updated : Dec 19, 2020, 4:35 PM IST

जळगाव - कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात अर्थात कोविड रुग्णालयात 21 किलोमीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कंपनीला प्लांट उभारणीचे काम देण्यात आले असून, लवकरच हा प्लांट कार्यान्वित होणार आहे. प्लांटच्या उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता प्लांटपासून रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डापर्यंत ऑक्सिजन पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

माहिती देताना जिल्हा कोविड रुग्णालय अधिष्ठाता.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात असून ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. त्यानंतर ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या प्रक्रियेला गती आली आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असताना रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्याच वेळी जर जलदगतीने कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असता तर रुग्णालय प्रशासनाचे कष्ट वाचले असते. मात्र, कोरोना नियंत्रणात असताना आता ऑक्सिजन प्लांट उभारला जात असल्याने तो भविष्यातील अडचणीत कामी येणार आहे.

वाहतूक खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार-

धुळे आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर वाहतुकीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबत माहिती देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी कोविड रुग्णालयात एका दिवसाला अवघ्या 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, मध्यंतरी हे रुग्णालय फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव होते. जिल्हाभरातून गंभीर अवस्थेतील रुग्ण याठिकाणी दाखल करण्यात येत होते. रुग्णालयातील सुमारे साडेचारशे बेड हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला होता. त्यामुळे कोविड रुग्णालयात एका दिवसाला प्रत्येकी 7 हजार क्षमतेचे 1200 ते 1400 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत होती. त्यामुळे पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नव्हता. सिलिंडरची मागणी व पुरवठा यात अटीतटीची स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर सातत्याने उपाययोजना कराव्या लागत होत्या. यावर उपाय म्हणून रुग्णालयातच लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.

पाईपलाईन जोडणीचे काम सुरू-

राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने 100 किंवा त्यापेक्षा अधिक बेड्स असलेल्या रुग्णालयात स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट असणे बंधनकारक केले आहे. याच अनुषंगाने धुळे आणि कोल्हापूर याठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर जळगावात देखील लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डातील बेड्सला ऑक्सिजन पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असून, येत्या आठवडाभरात प्लांट कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असेही डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.Conclusion:21 किलोलीटर क्षमतेचा आहे प्लांट-

कोविड रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या बाजूस मोकळ्या जागेत उभारण्यात आलेला लिक्विड ऑक्सिजन प्लांट हा 21 किलोलीटर क्षमतेचा आहे. त्यात एकाच वेळी सुमारे अडीच हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. एका जम्बो सिलिंडरमध्ये सुमारे 7 हजार लीटर ऑक्सिजन असतो. म्हणजेच, एकदा अडीच हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मित झाल्यानंतर, कोविड रुग्णालयाची आजची गरज लक्षात घेता किमान 10 ते 15 दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल. या माध्यमातून ऑक्सिजनची गरज तर पूर्ण होईलच, शिवाय ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीवर होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. विशेष म्हणजे, ऑक्सिजनच्या गरजेबाबत रुग्णालय स्वयंपूर्ण होईल, असा दावाही डॉ. रामानंद यांनी केला.

Last Updated : Dec 19, 2020, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details