जळगाव -'तुला मुलीच होतात', असे म्हणत पत्नीशी वाद घालून तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली आहे. पप्पू रतन पवार (वय 31 वर्षे, रा. विवेकानंद नगर तांडा, पाचोरा), असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी बुधवारी (दि. 19 मे) दुपारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात आरोपीच्या सात वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
खटल्याची थोडक्यात हकीकत अशी
पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे पप्पू पवार हा त्याची मृत पत्नी कस्तुराबाई (वय 30 वर्षे), मुलगी गौरी (वय 7 वर्ष), भाग्यश्री (वय साडेतीन वर्ष) व खुशी (वय दीड वर्ष) यांच्यासह राहत होता. तो पाचोरा येथे एका हॉटेलवर कामाला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. 9 जून, 2019 रोजी रात्री पप्पू याने 'तुला मुलीच होतात', असे म्हणत दारुच्या नशेत पत्नीशी भांडण केले. या भांडणात त्याने लाकडी दांडका पत्नीच्या डोक्यात टाकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या कस्तुराबाईला शेजारी राहणाऱ्या भाऊ व वहिनीने पाचोरा येथे रुग्णालयात नेले होते. त्या ठिकाणी तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते.
पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा
या घटनेनंतर कस्तुराबाई हिची आई पद्माबाई सखाराम राठोड (वय 60 वर्षे, रा. आनंद नगर तांडा, ता. एरंडोल) यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन पप्पू पवार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 10 जून, 2019 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी करून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.