जळगाव - लॉकडाऊन काळात मद्याच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी, माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. शहरातील पोलन पेठेत भोळेंचे 'नीलम वाईन्स' नावाचे दुकान होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नीलम वाईन्स, मुलगा विशाल भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय नोतवाणी यांचे नशिराबादचे विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन. एन. वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. त्यात या सहाही दुकानांमधील मद्यसाठ्यात तफावत आढळून आली होती. या दुकानांचे रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. याबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आणखी काही दुकानांचे परवाने रद्द होऊ शकतात, असे संकेतही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून मिळाले आहेत.