जळगाव -सध्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कोरोनामुळे जनता हवालदिल झाली आहे. अशा कालखंडात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करावा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लढ्याबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले. मी गडकरींच्या मताशी सहमत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगावात आले होते. आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी खडसेंनी भाजप नेत्यांची ओबीसी नेत्यांबाबत असलेली भूमिका, जळगाव महापालिकेतील गैरव्यवहार अशा विविध विषयांवर मते मांडली.
'कोरोनाविरोधात सर्वांनी एकत्र यावे'
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, कोरोनाच्या लढ्याबाबत भाजप नेते नितीन गडकरी यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. हीच भूमिका महिनाभरापूर्वी मीदेखील मांडली होती. कोरोनाचे संकट दूर करायचे असेल तर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे. आम्ही विरोधक आहोत की सत्ताधारी हे विसरून कोरोना कसा दूर करता येईल, यासाठी विधायक सूचना देणे, प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करणे गरजेचे आहे. यंत्रणेवर दररोज टीका करणे, त्रुटी काढणे असे प्रकार केल्यामुळे यंत्रणा नाउमेद होते. त्यामुळे असे प्रकार टाळायला हवे असे यावेळी खडसेंनी म्हटले आहे.
'भाजपात ओबीसी नेत्यांचा छळ'
भाजपा नेत्यांची ओबीसी नेत्यांबाबत असलेल्या भूमिकेवर मत मांडताना खडसे म्हणाले, भाजपाने नेहमी ओबीसी नेत्यांना न्याय देण्याचे काम केले आहे, पण अलीकडे चित्र बदलले आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अशाच पद्धतीने छळ झाला. त्यांचा जेवढा छळ झाला, तेवढा महाराष्ट्रातील अन्य कोणत्या नेत्याचा झाला नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात मी विधानसभेत भूमिका मांडली. परंतु, काही एक उपयोग झाला नाही. माझ्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांचा छळ झाला. आता तर चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकी देणे हे तर अति झाले. यावरूनच माझ्यामागे ईडी लवणे हे एक षडयंत्र होते हे स्पष्ट होत असल्याचा आरोपही यावेळी खडसेंनी केला आहे.
कोरोना काळात सर्वांनी एकत्र यावे 'ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणाचा गैरवापर करू नये'
वर्षानुवर्षे अनेक सरकारे आली आणि गेली. पण यापूर्वी असे ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणेकडून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार कुणीही केले नाहीत. पूर्वी या यंत्रणा तर जनतेला माहिती पण नव्हत्या. ईडी, सीबीआय तसेच एनआयए यासारख्या यंत्रणांद्वारे त्रास देणे चुकीचे असल्याचे मत खडसेंनी यावेळी मांडले. दरम्यान, जळगाव महापालिकेतील गैरव्यवहारांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यांची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी. याबाबत मी स्वतः लक्ष घातले असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार