महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळेल शिक्षण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा उपक्रम! - Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत शैक्षणिक विभागांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्राध्यापकांनाही 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्याची मुभा दिली आहे.

jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव

By

Published : Mar 18, 2020, 8:54 PM IST

जळगाव - राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत, तर प्राध्यापकांना घरी राहून कामकाज करण्याची मुभा दिली आहे. या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण व्यवस्थापन प्रणालीद्वारे अभ्यासक्रमाचे व्हिडिओद्वारे व्याख्यान व प्रश्‍नसंच उपलब्ध करून दिले आहेत. अशा प्रकारे कमी कालावधीत विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत शैक्षणिक विभागांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्राध्यापकांनाही 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्याची मुभा दिली आहे. प्राध्यापकांना सुट्टी दिल्यामुळे घरून ते कसे काय कामकाज करणार, असा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या प्रश्नाला चोख उत्तर दिले आहे. विद्यापीठाने 'मूडल सॉफ्टवेअर'चा वापर करून विद्यापीठाच्या संगणक केंद्राच्या सहकार्याने स्वतःची शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम) विकसित केली. याद्वारे विज्ञान, शिक्षणशास्त्र, सामाजिकशास्त्र, बहिःस्थ शिक्षण अभ्यासक्रमाचे सुमारे 20 व्हिडिओ या प्रणालीवर अपलोड करण्यात आले असून, स्वतः प्राध्यापकांनी जवळपास 45 मिनिटे ते 1 तास ही अभ्यासक्रमाची व्याख्याने दिली आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांना बहुविध प्रश्नसंचदेखील उपलब्ध करून देण्यात आले असून, 105 विषयांचे 11 हजार प्रश्न या संचामध्ये आहेत. विद्यार्थ्यांनी घरबसल्या संगणकावर हे प्रश्न सोडविण्याचा सराव करावयाचा आहे.

विशेष म्हणजे, मंगळवारी (ता. 17) विद्यापीठ प्रशाळांमधील सुमारे एक हजार 600 विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ई-मेलद्वारे या प्रणालीची लिंक (http://14.139.120.185) कळविली आहे. विद्यार्थ्यांच्या संपर्कात या काळात प्राध्यापक राहून ई-मेलद्वारे त्यांच्या शंकांचे निरसनही करू शकतात. येत्या एक- दोन दिवसांत अजून काही व्याख्याने अपलोड केली जाणार आहेत. विद्यापीठाने यापूर्वीच 'गुगल क्‍लासरूम वर्कशॉप'चे आयोजन केले होते. सुमारे सात कार्यशाळा यासंदर्भाने घेण्यात आल्या असून, प्राध्यापकही त्याचा उत्स्फूर्तपणे वापर करीत आहेत. Conclusion:कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव उपक्रमासाठी प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार, 'नॅक'चे संचालक प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक प्रा. एस. टी. इंगळे यांच्या सहकार्याने संगणक केंद्राचे दाऊदी हुसेन, प्रा. समीर नारखेडे, प्रा. मनोज पाटील यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details