जळगाव -जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे असलेल्या श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. या प्रकारासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, जेवण पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सोईसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. सोमवारी दुपारी तर एक धक्कादायक प्रकार समोर आला. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, जेवणात किडे व अळ्या आढळून आल्या. काही रुग्णांनी या प्रकाराबाबत जेवण देणाऱ्या ठेकेदाराच्या कामगाराला विचारणा केली असता, त्याने रुग्णांशी अरेरावी करत 'तुम्हाला आणखी 10 दिवस काढायचे आहेत', अशी धमकी दिली. त्यानंतर एका रुग्णाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली. अॅड. रोहिणी खडसे यांनी तक्रारीची दखल घेऊन तत्काळ मुक्ताईनगरचे तहसीलदार यांना सोबत घेऊन थेट कोविड सेंटर गाठले.