जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन कोरोनाबाधित समोर येत आहेत. त्यामुळे, रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा कृत्रिम ऑक्सिजन, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. या दोन्ही घटकांची वाढती मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्याने कोणत्याही क्षणी आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट
वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या विपरित परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला उपाययोजना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कृत्रिम ऑक्सिजन उत्पादकांना केवळ आरोग्य यंत्रणेला पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांना देखील कृत्रिम ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिवसाला 40 टन कृत्रिम ऑक्सिजनची गरज
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा अक्षरशः विस्फोट झाला आहे. दिवसागणिक हजारांपेक्षा अधिक नवे बाधित समोर येत आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 हजार 821 इतकी आहे. त्यात 1 हजार 748 रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर, तर 689 रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एवढ्या रुग्णसंख्येसाठी दररोज जिल्ह्यात किमान 40 टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन गॅस साठवणूक करण्यासाठीची क्षमता 50 टनांची आहे. मात्र, संपूर्ण राज्यभर कोरोनामुळे आणीबाणीची स्थिती असल्याने जळगाव जिल्ह्यासाठी दररोज केवळ 30 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे, 8 ते 10 टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती भविष्यात नियंत्रणात आली नाही तर रुग्णसंख्या अशाच प्रकारे वाढत जाऊन कृत्रिम ऑक्सिजनची गरज अजून भासेल. अशा वेळी अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.