जळगाव - न्यायालयात आपल्याविरुद्ध साक्ष दिल्याच्या रागातून शहरातील चौगुले प्लॉट भागात राहणारे किशोर मोतीलाल चौधरी यांचा मार्च २०१६ मध्ये निर्घृण खून झाला होता. या खून खटल्यात आज (शनिवारी) जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप, 3 जणांना मारहाणीच्या कलमाखाली 2 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. तर १० जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सुरेश दत्तात्रय सोनवणे (वय ४४, रा. प्रजापतनगर) याला खुनाच्या कलमाखाली जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड, उमेश धनराज कांडेलकर (वय ३१), रत्नाबाई सुरेश सोनवणे (वय ३९) आणि वैशाली उमेश कांडेलकर (वय २९, सर्व रा. प्रजापतनगर) या तिघांना मारहाणीच्या कलमाखाली दोन वर्षे कारावास व २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तर रंजनाबाई भगवान कोळी (वय २९), योगिता गणेश सपकाळे (वय ३१), सखुबाई विश्वास सपकाळे (५४), स गर जगन्नाथ सपकाळे (वय ३२, सर्व रा. प्रजापतनगर), ज्ञानेश्वर भिवसन ताडे उर्फ नानामराठे (वय ४३, रा. आस्वारनगर), पंकज वासुदेव पाटील (वय ३१, रा. चौगुले प्लॉट), गणेश विश्वास सपकाळे (वय ३६, रा. प्रजापतनगर ), अंजना किशोर कोळी (वय ३१) आणि किशोर अनिल कोळी (वय ३१, दोघे रा. डिकसाई, ता. जळगाव) या दहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
काय होते प्रकरण?
एका न्यायालयातील खटल्यात मृत किशोर चौधरी यांचे लहान भाऊ सागर चौधरी यांनी सुरेश सोनवणे याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. याचा राग मनात ठेवून १० मार्च २०१६ रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सुरेश याने किशोर चौधरी यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यानंतर किशोर घराकडे आल्यानंतर सुरेशसह इतर संशयितांनी किशोरसह त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी किशोर यांच्या छातीत, पोटात बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार केले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी किशोर यांचे वडील मोतीलाल भावलाल चौधरी (रा. चौगुले प्लॉट) यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी या गुन्ह्याचा तपास करुन ८ जून २०१६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारपक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने चार जणांना शिक्षा ठोठावली. १० जणांना निर्दोष मुक्त केले तर एक संशयित अद्याप बेपत्ता आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप सादर करण्यात आलेले नाही. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी राजेंद्र सैंदाणे, केसवॉच प्रशांत देशमुख आणि भगवान आरखे यांनी सहकार्य केले.