जळगाव -गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर चांगला आणि पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लागलेल्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पेरणीची कामे सुरू झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या कापूस, मका, सोयाबीन तसेच उडीद, मूग अशा कडधान्याची पेरणी केली जात आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. त्यात प्रमुख नगदी पीक असलेला कापूस 5 ते साडेपाच लाख हेक्टर, ज्वारी, बाजरी, मका यासारखी तृणधान्ये दीड ते 2 लाख हेक्टर, भुईमूग, सोयाबीन 30 ते 35 हजार हेक्टर त्याचप्रमाणे इतर पिकांची 25 ते 30 हजार हेक्टरवर लागवड होते. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकरी खरिपाची पेरणी करत आहेत. पेरणीची कामे सुरू झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडचणींचा सामना करत असलेल्या मजुरवर्गाच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरवर्गातही चैतन्य निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. त्यामुळे शेतीशी निगडित उद्योग-व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्या बाबींचा फटका काही प्रमाणात खरीप हंगामाला देखील बसला आहे. कृषीची बाजारपेठ उशिरा उघडल्याने जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापूस लागवडीवर परिणाम झाला आहे. यावर्षी पूर्वहंगामी कापसाची लागवड नेहमीपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी घटली. आता शेतकरी हंगामी कापूस लागवडीसोबत मका, ज्वारी, बाजरी अशा कडधान्याच्या पेरणीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे यंदा कडधान्याचा पेरा नेहमीच्या तुलनेत 25 टक्क्यांहून अधिक होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
खते व बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही -