जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसेंचा भाजप सोडण्याचा निर्णय निश्चितच दुर्दैवी आहे. त्यामुळे, पक्षाला नुकसान तर होणार आहे, पण ते क्षणिक आहे. शेवटी पक्ष हा विचारांवर आणि तत्वांवर चालतो. पक्ष कधीही थांबत नाही, अशा शब्दात भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज दुपारी भाजपला अखेरचा रामराम केला. त्यानंतर या विषयासंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते बोलत होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांचे भाजप वाढीसाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आणि मी सोबत काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु, त्यांचा भाजप सोडण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे भाजपला निश्चितच नुकसान सहन करावे लागेल. पण, ते नुकसान क्षणिक असणार आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
भाजप हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही
भाजप हा काँग्रेस, शिवसेनेप्रमाणे घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही, की ज्या ठिकाणी गांधी गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, आता पुढे काय? भाजप खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. याठिकाणी अनेकजण पक्षात आले, मोठे झाले आणि गेलेही. परंतु, पक्ष वाढतच राहिला. या पक्षात चहा विकणारा सर्वसामान्य माणूस देखील देशाच्या पंतप्रधानपदी जाऊ शकतो, ही भाजपची ताकद आहे. खडसेंच्या जाण्याने भाजपला निश्चितच नुकसान सहन करावे लागेल. परंतु ते क्षणिक असणार आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन ही दोन नावे भाजपसाठी मोठी होती. परंतु, खडसेंना भाजपकडून डावलले जात असताना गिरीश महाजन यांना पाठबळ दिले गेले. खडसेंना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून वगळल्यानंतर गिरीश महाजन हेच पक्षासाठी जिल्ह्यातील निर्णय घेत होते. त्यामुळे, खडसे आणि महाजन यांच्यात हाडवैर होते. याच कारणावरून खडसे समर्थकांमध्ये नाराजी असायची. आता मात्र, खडसेंनी वेगळी चूल मांडल्याने दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक असणार आहेत.
हेही वाचा-एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागतच, त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य; खडसे समर्थकांची भावना