जळगाव - 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा देणाऱ्या भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. आता आपण राज्याच्या सत्तेत आहोत. सत्तेच्या माध्यमातून 'भाजपमुक्त' महाराष्ट्रासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.
भाजपमुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्नशील रहा, सुनील केदारांचे कार्यकर्त्यांना आव्हान हेही वाचा... 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'
महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले डिजिटल संग्रहालय असलेल्या जळगावातील गांधीतीर्थाला भेट देण्यासाठी सुनील केदार शुक्रवारी जळगावात आलेले होते. गांधीतीर्थाला भेट दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस भवनात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, युवक काँग्रेसचे देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुनील केदार पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यात आपण सत्तेचे जे झाड लावले आहे, त्याची फळे सर्वांना मिळतीलच, याची खात्री नाही. परंतु, या झाडाची सावली सर्वसामान्य जनतेला कशी मिळेल? यादृष्टीने आपणाला प्रयत्न करायचे आहेत.
हेही वाचा... 'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'
सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून आपल्याला आपले पक्षसंघटन बळकट करण्याची संधी मिळाली आहे. आपला काँग्रेस पक्ष एक ट्रेन आहे. यात लोक येतील, उतरतील आणि नव्याने चढतीलही. त्याचा विचार सोडून द्या. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन सर्वांनी पक्षसंघटन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केदार यांनी केले. दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी सुनील केदार यांनी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आपल्या खात्याशी निगडित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत शासकीय योजनांचा आढावा घेत त्यांनी काही अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कामात कुचराई खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.