जळगाव -'विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या स्नातकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. मात्र, त्याआधी उत्तम वर्तन असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. किंबहूना उत्तम मनुष्यत्त्व हीच प्राथमिकता असायला हवी, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात स्नातकांना उद्देशून दिला.
उत्तम वर्तन असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. 3 मे) रोजी दूरदृश्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे पार पडला. यावेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षस्थानावरून दीक्षांत भाषण केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. 3 मे) रोजी दुरदृश्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे पार पडला. यावेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षस्थानावरून दीक्षांत भाषण केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रभारी कुलगुरु, प्रा. ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार यांची उपस्थिती होती.
नवनवे बदल आत्मसात करा-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात ते म्हणले की, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. देशातही संत, मुनी, ऋषी यांनी समाजाला उपयोगी अशी शिकवण दिली आहे. या शिकवणीचा अंगीकार आपण करायला हवा. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे. निरक्षर असून ही बहिणाबाईंनी आपल्या काव्यातून जगण्याचे मोठे तत्त्वज्ञान सांगितले आहे, असे सांगताना श्री. कोश्यारी यांनी बहिणाबाईंच्या ‘अरे संसार संसार’ या कवितेचे उदाहरण दिले. स्वामी विवेकानंद यांनी देखील उत्तम माणूस होण्यावर भर दिला होता. मनुष्य केवळ पदवी घेऊन शिक्षित होत नाही. अथवा जन्माने माणूस असून उपयोग नाही, तर व्यक्तींमध्ये सद्गुण असायला हवेत. अन्यथा पशुत्वामध्ये त्याची गणना होते. म्हणूनच पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न करावा. बदलत्या काळातील आव्हानांचा स्वीकार करताना नवे बदल आत्मसात करायला हवे, असाही सल्ला त्यांनी दिला.
कोरोनाच्या संकटात तरुणांनी आपले योगदान द्यावे-
कोरोनाचा उल्लेख करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, मधल्या काळात सगळे जण निश्चिंत झाल्यामुळे कोरोना वाढला. कोरोना सोबत राहण्याची मानसिकता करून घ्यावी लागेल. मात्र, त्याच बरोबर मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा अवलंब करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न तरुणांनी करायला हवा. समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना लक्षात ठेऊन अशा संकटाचा मुकाबला करण्यासाठी तरुणांनी आपले योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठाच्या कार्याचे कौतूक-
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांनीही दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शिक्षणापासून साहित्यापर्यंतची परंपरा या विद्यापीठाने जपली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेणारे हे पहिले विद्यापीठ आहे. त्याचे अनुकरण राज्यातील इतर विद्यापीठांमध्येही केले जाईल. प्रत्येक विद्यापीठात असे साहित्य संमेलन घेऊन, पुढे एकत्रित साहित्य महोत्सव घेऊन राज्याची साहित्य व संस्कृती जोपासली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. ‘कमवा आणि शिका’ योजना जळगाव विद्यापीठात प्रभावीपणे राबविली जाते तशी ती इतर विद्यापीठांमध्ये प्रभावीपणे राबविली जाईल, असे सांगून श्री. सामंत यांनी जळगाव विद्यापीठातील तक्रार निवारण केंद्राचे मोड्युल इतर विद्यापीठांमध्येही राबविले जाईल. हे केवळ तक्रार निवारण केंद्र न राहता तक्रार व शंका निरसन केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरच सर्व विद्यापीठांमध्ये ‘तंबाखु मुक्त’ आणि ‘छेडछाड मुक्त कॅम्पस’ अभियान शासनाकडून राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनामुळे शिक्षणात काही व्यत्यय निर्माण झाले. मात्र, सर्व विद्यापीठांनी अत्यंत पारदर्शकपणे ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे घेतल्या. या वर्षीच्या इतरही परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता बघून विद्यापीठांनी यशस्वीपणे ऑनलाईन पद्धतीने पार पाडाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी विद्यापीठाचा विकास आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. इनक्युबेशन सेंटर, आदिवासी अकादमी, रुसा अंतर्गत सुरू असलेली कामे, विद्यापीठ कॅम्पसवरील विकास कामे याबाबत त्यांनी माहिती दिली.
२८ हजार ९८ स्नातकांना पदव्या बहाल-
सुवर्ण पदक प्राप्त ९९ विद्यार्थ्यांपैकी तीन सुवर्णपदक धारक विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी नावे घोषित केली. या दीक्षांत समारंभात २८ हजार ९८ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक.चे ४३७ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आल्या.