जळगाव -जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वरखेड बुद्रुक गावातील सुपुत्राने जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. जयंत बाबुसिंग पाटील (कच्छवा) असे या सुपुत्राचे नाव आहे. त्यांची ऑस्ट्रेलियाच्या निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापक प्रमुखपदी निवड झाली आहे.
सिडनी येथील कार्यालयात जयंत पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. अंगी सतत परिश्रम करण्याची तयारी आणि मनात जिद्द बाळगली तर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात, हेच जयंत पाटील यांनी अधोरेखित केले आहे.
जळगावच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा चाळीसगाव तालुक्यातील वरखेड हे गिरणा नदीच्या खोऱ्यात वसलेले गाव आहे. जयंत पाटील हे याच मातीतले आहेत. त्यांचे वडील बाबुसिंग पाटील हे स्टेट बँकेत जनरल मॅनेजर पदावर होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. बाबुसिंग पाटील यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. अपार कष्ट आणि बुद्धीच्या जोरावर जयंत पाटील यांनी प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्यांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे झाले आहे. त्यांची ऑस्ट्रेलियातील निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापक पदावर निवड झाली आहे.
अनेक देशांच्या उमेदवारांना टाकले मागे
ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या निवडीची प्रक्रिया चुरशीची होती. या महत्वाच्या पदावर आपली निवड व्हावी म्हणून अनेक देशातील उमेदवार स्पर्धेत होते. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी भारतीय असणाऱ्या जयंत पाटील यांच्या नावावर निवडीची मोहोर उमटवली. जयंत पाटील यांच्या निवडीमुळे पुन्हा एकदा सातासमुद्रापार तिरंगा डौलाने फडकला आहे.
निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी-
स्थानिक व राज्य पातळीवरील निवडणुकांचे नियोजन, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे, माहिती-तंत्रज्ञान विभागातील प्रणालींची देखरेख, ऑस्ट्रेलिया संसदेने ठरवून दिलेले नियम व दिशानिर्देश यांचे पालन करण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर आहे. त्यासाठी ते निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या राज्यातील सप्टेंबरमधे होणाऱ्या निवडणुका वर्षभर पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेत पाटील यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यासाठी इंटरनेट वोटिंग प्रणालीचा वापर करण्याच्या निर्णय प्रक्रियेतही पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
जयंत पाटील म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑस्ट्रेलियात नियमित मूल्यमापन होते. जनतेच्या कामाचा निपटारा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. निवडणुकीची प्रक्रिया लांबली असताना इंटरनेट व्होटिंग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजोबा स्वांत्र्यसैनिक होते. वडीलांनी कारकून ते व्यवस्थापक असा प्रवास केला.
जयंत पाटील यांची निवड म्हणजे देशासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.
खान्देशातील अनेक तरुणांनी सातासमुद्रापार कर्तृत्वाची दाखविली चमक
खान्देशातील अनेक तरुणांनी आपल्या कर्तृत्वाची चमक सातासमुद्रापार दाखवली आहे. चाळीसगावचे डॉ. अर्जुन देवरे हे भारतीय परराष्ट्र सेवेत विदेश राजदूत म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यानंतर जयंत पाटील यांनी भरारी घेऊन खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जयंत पाटील यांनी बार्कलेज, मेरील लिंच व मॉर्गन स्टॅनली आदी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्येही उपाध्यक्ष पदाची जबाबदारी निभावली आहे.
जयंत पाटील यांच्या वडिलांनी व्यक्त केला आनंद
जयंत पाटील यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या वरखेड येथील राहत्या घरी दिवाळीप्रमाणे आनंद व्यक्त होत आहे. मुलाने जिल्ह्याचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल केल्याने सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांचे वडील बाबूसिंग पाटील यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.