जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एका व्यक्तीने आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडली होती. या घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे श्राद्ध घालत या घटनेचा निषेध नोंदवला.
दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे या औरंगाबाद दौराकरून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईत आल्या. दादर स्थानकावर उतरत असताना कुलजित सिंह मल्होत्रा नामक एका टॅक्सी एजंटने त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदार असलेल्या महिलेसोबत असा निंदनीय प्रकार घडू शकतो तर सर्वसामान्य युवती व महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसने उपस्थित केला आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुढे करत शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी श्राद्ध घालत आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.