जळगाव- राज्यभरात भाजप आणि सेनेत मेगा भरती झाली. त्यात जळगाव जिल्हा अपवाद ठरला होता. मात्र, आता राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे नेते दिवंगत जे. टी. महाजन यांचे पुत्र व फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज धुळे येथे झालेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संमेलनात भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यातील मेगा भरतीत जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने प्रवेश न केल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या पाठीशी मजबूत उभे आहेत, असे मानले जात होते. मात्र, प्रथमच जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शरद महाजन हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. यावल, न्हावी, फैजपूर भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपत प्रवेश केला.
हेही वाचा - जळगावात भाजपकडून स्वबळाची तयारी; सेनेच्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा
आज (मंगळवार) धुळे येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, तसेच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत न्हावी येथील सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, दूध उत्पादक संस्था चेअरमन नितीन चौधरी, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन प्रितेश पाटील, जे. टी. महाजन फ्रुटसेल सोसायटी सदस्य नारायण कोलते, तसेच रावेर-यावल तालुक्याचे ज्येष्ठ नेते भागवत विश्वनाथ पाटील, नरेंद्र नारखेडे, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, न्हावी अल्पसंख्याक काँग्रेस शहराध्यक्ष गफुर खाटीक तसेच तालुक्यातील 20 ते 22 स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला हा मोठा धक्का असून रावेर मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत.
हेही वाचा - जळगावात 34 लाख 47 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क