जळगाव- फेसबुकवर एका २२ वर्षीय तरुणासोबत शहरातील ३४ वर्षीय विवाहितेची ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांचे सुत जुळले. यानंतर पळून जात विवाहिता थेट उत्तरप्रदेशातून थेट नेपाळ बॉर्डरवर पोहोचली आहे. त्या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला. कुटुंबीयांसोबत पुन्हा घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे हताश झालेले विवाहितेचे कुटुंबीय आणि पोलीस जळगावात माघारी परतले आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात राहणारी ही ३४ वर्षीय महिला आहे. तिला १४ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून या महिलेची उत्तरप्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणासोबत मैत्री झाली. दोघांच्या गप्पा वाढल्यानंतर सुत जुळले. एकमेकांसोबत राहून संसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. यानंतर गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१९ ला या महिलेने जळगाव सोडले. पत्नी हरवल्यामुळे तिच्या पतीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिचा मोबाईल दिल्ली येथे सुरू असल्याची तांत्रिक माहिती पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मिळवली होती. यानंतर महिलेने मोबाईल देखील बंद केला होता. त्यामुळे महिलेचे अपहरण झाले की काय? या संशयातून जिल्हापेठ पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.