जळगाव -जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव निघाले असून आगामी अडीच वर्ष जिल्हा परिषदेवर पुन्हा महिला राज राहणार आहे. यामुळे राजकीय समीकरणे काही फारशी बदलणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बांधकाम सभापती रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.
जिल्हा परिषदेत गेल्यावेळी भाजपच्या उज्ज्वला पाटील यांची काँग्रेसच्या पाठिंब्याने निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला समाप्त झाला होता. मात्र, निवडीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मंगळवारी मुंबईत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान, येत्या महिनाभरानंतर नवीन अध्यक्षांची निवड होऊन नव्या वर्षी नवे अध्यक्ष असे समीकरण जिल्हा परिषदेत असेल. अध्यक्षपद महिला खुले निश्चित झाल्यानंतर आपण विधानसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा जपली. बंडखोरी केली नाही. त्यामुळे पक्ष चांगलाच निर्णय घेईल, असे संकेत देत 'मी पुन्हा येईन' च्या प्रश्नावर अध्यक्षपती मच्छिंद्र पाटील यांनी कानावर हात ठेवले.
गेल्यावेळी असलेले महिला राखीव आरक्षण यंदाही कायम असल्याने जिल्हा परिषदेत वेगळ्या सत्ता समीकरणाच्या आशा धुसर झाल्याचे चित्र आहे. अध्यक्षपद खुले निश्चत झाले असते तर स्पर्धा वाढून राजकीय खेळ्यांना उत आला असताना. आता मात्र, पक्षाकडून दिलेल्या उमेदवारांना पक्षाचा आदेश माणून स्वीकारले जाईल, असे सदस्यांच्या एकंदरीत हालचालींवरून स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेत निधीच्या मुद्दयावरून नाराज गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल असे संकेत होते. मात्र, या सदस्यांना पक्षांना नव्हे अध्यक्ष, उपाध्यक्षांना अधिक विरोध दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास हा गट बाहेर पडण्याची शक्यता मावळण्यात जमा आहे. शिवाय अशा स्थितीत राष्ट्रवादी व सेना काही राजकीय खेळी खेळेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आकड्यांची जुळवाजुळव सोपी नसल्याने सेना, राष्ट्रवादी यात कितपत रस घेईल, हे बघावे लागणार आहे.