जळगाव - आपल्या कुटुंबीयांच्या शोधार्थ फिरत असलेली गीता परभणीला जात असताना रविवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील भुसावळात आलेली होती. याठिकाणी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या वतीने तिचे सहृदयी स्वागत करण्यात आले. भुसावळकरांच्या प्रेमाने ती चांगलीच भारावली. स्वागताच्या गोड आठवणींसह रोटरी क्लबच्या सदस्यांच्या दिलेल्या सदिच्छांचा स्वीकार करून ती परभणीला रवाना झाली.
भुसावळकरांच्या सहृदयी स्वागताने भारावली गीता! - जळगाव बातम्या भुसावळ गीता
मध्यप्रदेशातून परभणीला जात असताना रविवारी सायंकाळी 5 वाजता गीता भुसावळात दाखल झाली. तिच्यासोबत इंदूर येथील आनंद सेवा संस्थेचे ग्यानेंद्र पुरोहित, बगदीराम बाबर, मध्यप्रदेश पोलीस दलाचे कर्मचारी दीपेंद्र राजपूत, महिला पोलीस कर्मचारी फरहीन खान होते. या सर्वांचे रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मध्यप्रदेशातून परभणीला जात असताना रविवारी सायंकाळी 5 वाजता गीता भुसावळात दाखल झाली. तिच्यासोबत इंदूर येथील आनंद सेवा संस्थेचे ग्यानेंद्र पुरोहित, बगदीराम बाबर, मध्यप्रदेश पोलीस दलाचे कर्मचारी दीपेंद्र राजपूत, महिला पोलीस कर्मचारी फरहीन खान होते. या सर्वांचे रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या वतीने स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष सुधाकर सनंसे, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, सेक्रेटरी जीवन महाजन, सुनील वानखेडे, योगेश इंगळे, प्रदीप महाजन, बाळा राजपूत, राहुल आंबेकर यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. रोटरी क्लबतर्फे गीताच्या कुटुंबीयांच्या शोधार्थ यथायोग्य मदत करण्याची ग्वाही सुधाकर सनंसे व संजय भटकर यांनी दिली.
20 वर्षांपूर्वी हरवली होती गीता-
तब्बल 20 वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात पोहोचलेल्या मूकबधीर गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. गीता 8 वर्षांची असताना चुकून रेल्वेने अमृतसरला पोहोचली होती. तिथून लाहोरजवळ समझोता एक्सप्रेसमध्ये ती सापडली होती. दहा-बारा वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर 26 ऑक्टोबर 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तिला भारतात आणले. 5 वर्षे इंदूरच्या मूकबधीर संघटना आश्रमात राहिल्यानंतर चार महिन्यांपासून ती आनंद सेवा संस्थेमध्ये आली आहे. दरम्यान, गीताच्या कुटुंबाचा शोध यापूर्ण काळामध्ये घेतला गेला. तिने दिलेल्या माहितीनुसार, तिला आठवत असलेल्या सर्व संकेतस्थळांच्या आधारे तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील एका कुटुंबाने गीता आपली मुलगी असल्याचा दावा केल्याने आनंद सेवा संस्थेचे सदस्य तिला जिंतूरला घेऊन जात आहेत.
परभणीच्या पहल 'फाउंडेशन'मध्ये राहणार-
परभणी येथील मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या पहल फाउंडेशनच्या माध्यमातून गीताच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी यापुढील काळात कँपेनिंग केले जाणार आहे. यासाठी गीताला काही महिने परभणीत वास्तव्याला ठेवण्याचा विचार करण्यात येत आहे. कारण गीताच्या सवयी, आवडीनिवडी आणि तिने सांगितलेल्या तिच्या घराजवळच्या खानाखुनानुसार तिचा परिवार याच भागात असावा, असे तिचा सांभाळ करणाऱ्या आनंद सेवा सोसायटीला वाटते. यामुळेच गीताला परभणीत ठेवून या भागात तिच्या कुटुंबाचा शोध घेणार असल्याचे ग्यानेन्द्र पुरोहित यांनी यावेळी सांगितले.