जळगाव- गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद राहिल्याने व्यापारी आर्थिक संकटात आहे. टाळेबंदी खुली होण्याच्या प्रक्रियेमध्ये सोमवार ते शुक्रवार ५ दिवस दुकाने सुरु ठेवण्याची व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, अजूनही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सातही दिवस दुकाने सुरू ठेवण्याची मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
टाळेबंदीमुळे आवक पूर्णपणे थांबलेली असतानाही दुकानाची देखभाल-दुरुस्ती, भाडे, लाईटबील व कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च व्यापाऱ्यांनी सहन केला आहे. टाळेबंदीची प्रक्रिया खुली झाल्यानंतरही बाजारपेठेत थंडावलेले वातावरण आहे. त्यामुळे दुकानांची वेळ वाढविणे व आठवडाभर दुकाने सुरू ठेवावी, अशी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची सरकारकडे मागणी आहे. या मागण्याबाबतचे निवेदन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया व कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना दिले.
अशा आहेत व्यापारी महामंडळाच्या मागण्या
१) शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास उत्पादन व विक्रीसाठी २५ टक्क्यांचा अधिकचा कालावधी व्यापारी बांधवांना मिळणार आहे. त्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
२) पितृपक्ष संपल्यावर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडतील. ७ दिवसांचा आठवडा झाल्यास 'सोशल डिस्टंसिंग' पाळणे व्यापारी बांधव आणि नागरिक सर्वांसाठीच सोईचे होईल. कारण ५ दिवसांचा ताण ७ दिवसांमध्ये विभागला जाईल.
३) कोविडसंदर्भात काळजी घेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. परंतु मंदीची लाट आलेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करणे हीसुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आणि तार्किकदृष्ट्या योग्य पाऊल आहे.
४) बाजारपेठेवर अवलंबून असलेले हमाल, मजूर, रिक्षाचालक, मालवाहक इत्यादी सर्वांनाच २ दिवस बाजार बंद राहत असल्याने तडजोड करावी लागत आहे. शनिवार-रविवारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाल्यास हातावर पोट असलेल्या माणसांना रोजगार मिळेल.
राज्यातील अन्य शहरांप्रमाणे ळगाव शहरातही शनिवार-रविवार दोन दिवस असलेली बंदी उठवून व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी जाहीर करावी, असे जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने म्हटले आहे. सध्या दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ती वाढवून रात्री ९ वाजेपर्यंत करावी, अशी जिल्हा व्यापारी महामंडळाने मागणी केली आहे.