जळगाव -शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवनात होणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’
या अभियानाच्या कालावधीत परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखा यांच्यावतीने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे ब्रीदवाक्य घेऊन, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी शहर व जिल्ह्यातील नागरीकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक गणेश पाटील व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुणगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
'यांच्या' उपस्थितीमध्ये पार पडणार उद्घाटन समारंभ
या कार्यक्रमाला समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, यंत्र अभियंता तथा विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची उपस्थिती राहाणार आहे.