जळगाव - 'दाही सरता वहन आली एकादशी मोठी, मंग सावरला रथ, झाली गावामंधी दाटी' खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या कवितेच्या ओळी ऐकल्या की सुवर्णनगरी जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची आठवण येते. गुरुवारी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर सुवर्णनगरीत श्रीराम रथोत्सव साजरा झाला. यावर्षी कोरोनामुळे रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. परंपरा खंडित होऊ नये म्हणून रथाचे जागेवरच विधिवत पूजनकरून १० पाऊले रथ ओढण्यात आला. यावर्षी रथोत्सवाचे स्वरूप छोटेखानी असले तरी भाविकांचा उत्साह मात्र पूर्वीप्रमाणेच होता.
गुरुवारी पहाटे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवमूर्तीला महाअभिषेक घालून काकडा आरती पार पडली. त्यानंतर सकाळी १० वाजेपासून झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या रथाला रथघरातून बाहेर काढण्यात आले. मग त्यानंतर सर्व ब्राम्हणवृदांच्या पवित्र व मंगलमय मंत्रोच्चारात रथाची महापूजा करण्यात आली. यावर्षी रथाची महापूजा श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख गादिपती मंगेश महाराज जोशी यांचे चिरंजीव श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. रथाच्या महापूजेनंतर श्रीराम मंदिरात पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या उत्सवमूर्तीची महाआरती झाली. महाआरतीनंतर रामचंद्रांची उत्सवमूर्ती सनईचा मंजुळ सूर, चौघडे व तुतारींचा निनाद तसेच 'जय श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्र की जय' अशा जयघोषात फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान झाली. सेवेकऱ्यांनी रथ जागेवरून १० पाऊले ओढला. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
उत्सवाचा शाही थाट -
श्रीराम रथावर प्रभू रामचंद्रांची उत्सव मूर्ती विराजमान झाली. त्यानंतर रथावर गरुड, मारुती, अर्जुन व दोन लाकडी घोड्यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. तर रथाच्या अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी तसेच पालखीत श्रीसंत मुक्ताईंच्या पादुका होत्या. रथ जागेवरून अवघे १० पाऊले ओढण्यात आला. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मास्क परिधान करून येत होते. रथाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसाद अर्पण केला जात होता.