जळगाव - शहरात राज्य व केंद्र सरकारच्यावतीने सरकारी व खासगी रुग्णालयात नागरिकांना कोरोना लसीकरणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी शासनाने २५० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये लस दिल्यानंतर नागरिकांना ३०० ते ३५० रुपयांची औषधी लिहून ती त्यांच्याच मेडिकलमधून घेणे बंधनकारक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्यांनी हे आरोप केल्याने खळबळ उडाली.
जळगावातील खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या नावाने ज्येष्ठांची लूट होत असल्याचे समोर आले मनपा स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, नगर सचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपाययोजनांसाठी घेण्यात आलेल्या काही कामांना मंजुरी देण्यात आली.
मनपा प्रशासनाने लसीकरणाची केंद्रे वाढवावीत -
मनपा प्रशासनाकडून कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणात त्यांनी लसीकरणाची केंद्रे वाढवली तर वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर काही प्रमाणात अंकुश लावण्यात मनपा प्रशासनाला यश येऊ शकते. तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या नावावर जो गोरखधंदा सुरू झाला आहे. त्यावर देखील आळा बसेल, अशी मागणी नितीन लढ्ढा यांनी सभेत केली. लसीकरणाची व्यवस्था ही सद्यस्थितीत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याची गरज आहे. मात्र, काही जणांकडून या समस्येचा देखील व्यवसायासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला.
खासगी रुग्णालयांना सूचना देणार - आयुक्त
ही बाब गंभीर असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. ज्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे नागरिकांची दिशाभूल केली जात असेल. त्या रुग्णालयांना व मेडिकल चालकांना सूचना दिला जातील. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच शहरात मनपाकडून लसीकरणाचे केंद्र वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी या सभेत दिली.