जळगाव - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 24 मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मात्र, काहीजण विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी थेट कडक कारवाईचा बडगा उगारलाय. शहरात पोलिसांच्यावतीने गुरुवारी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणांहून 30पेक्षा अधिक दुचाकी तसेच रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असतानादेखील नागरिक बेपर्वाईने वागत आहेत. काहीजण कोणत्याही प्रकारची गरज नसताना बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांची वाहने जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. यानंतर बुधवारी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात झाली आहे. शहर, जिल्हापेठ, रामानंदनगर, शनीपेठ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिकठिकाणी नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.