जळगाव -स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे सुमारे 50 लाखांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला. जप्त केलेला हा ट्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जळगाव येथे आणत असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील जैन व्हॅलीसमोर पकडला. जेथे ट्रक पकडला तेथेच गुन्हा दाखल का केला नाही, या कारणावरून आमदार चव्हाण आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणून ट्रकमधील गुटख्याच्या साठ्याच्या मोजणीला सुरुवात करण्यात आली.
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, 50 लाखांचा गुटखा जप्त - जळगाव पोलीस कारावाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे सुमारे 50 लाखांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला. हा ट्रक जळगाव येथे आणत असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून ट्रक जळगाव तालुक्यातील शिरसोलीमध्ये पकडला. ज्या ठिकाणी ट्रक पकडला त्याच ठिकाणी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल चव्हाण यांनी पोलिसांना केला. यावरून आमदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
धुळे येथून निघालेला गुटख्याचा ट्रक मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. या ट्रकची तपासणी केली असता, या ट्रकमध्ये अंदाजे 50 लाखांच्या वर अवैध गुटख्याचा साठा असल्याचे दिसले. हा ट्रक वरिष्ठांच्या सुचनेनुसार जळगाव येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करून कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. त्या आदेशानुसार, जळगाव गुन्हे शाखेचे कर्मचारी हा ट्रक घेऊन जात असताना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांनी हा ट्रक शिरसोली गावाजवळील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन व्हॅली येथे पाठलाग करून थांबविला. या ट्रकवरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला, त्या पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला गेला नाही, यावरून गुन्हे शाखेचे पोलीस व आमदार चव्हाण यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणण्यात आला. तेथे आता सर्व गुटख्याच्या गोण्या ट्रकमधून उतरवून त्याची मोजणी पोलीस यंत्रणा करीत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.