जळगाव - कत्तलीसाठी जाणाऱ्या ६२ जनावरांची जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरणगाव शहरात ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी १ ट्रक जप्त केला असून, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख वसीम शेख यासीन (रा. वरणगाव), बशीर कुरेशी उर्फ चढ्ढा (रा. वरणगाव), शेर मोहम्मद झाकीर हुसेन (रा. बेरजाली, महिदपूर, मध्यप्रदेश) व अन्य १ जण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
कत्तलीसाठी जाणाऱ्या ६२ जनावरांची सुटका वरणगाव शहरातील इमाम कॉलनीत शेख वसीम व बशीर कुरेशी यांच्या मालकीच्या जागेत एक पत्र्याचे शेड तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी गोवंशाची जनावरे आणून टप्प्याटप्प्याने त्यांना कत्तलीसाठी पाठविले जात होते. शुक्रवारी त्याठिकाणी (एमएच. १८ बीजी. ०३१५) क्रमांकाच्या ट्रकमध्ये ६७ जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आली होती. जनावरांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्याने त्यातील ५ जनावरांचा मृत्यू झाला होता. ही सर्व जनावरे कत्तलीच्या उद्देशाने आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. जिवंत असलेल्या ६२ जनावरांना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. आहे.
आरोपींवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी ४ जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९, ११, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (ड), (ई), (फ)तसेच मोटार वाहन कायदा व भादंवि कलम ४२९ नुसार वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.