जळगाव- देशभरातील विविध ठिकाणच्या बँक खातेदारांच्या एटीएम कार्डसह बँक खात्याचा डेटा मिळवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा डाव जळगाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 'इथिकल हॅकर' मनीष भंगाळे याची मदत घेतली. त्यानंतर अत्यंत अभ्यासपूर्ण तपास व चौकशी करत या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्वरलाल पाटील (वय 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) व मोहसीन खान ईस्माईल खान (वय 35, रा. देवपूर, धुळे) या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्या चौकशीत आणखी 7 संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपी सुमारे 412 कोटी रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने लांबवणार होते.
जळगाव पोलिसांनी हॅकरच्या मदतीने उधळला 412 कोटी रुपयांच्या चोरीचा डाव! - जळगाव जिल्हा गुन्हे वृत्त
ऑनलाईन पद्धतीने बँक खातेदारांचे पैसे चोरण्याचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. जवळपास ४१२ कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास करण्याचे नियोजन या टोळीने केले होते. विशेष म्हणजे यासाठी टोळीने एकनाथ खडसे प्रकरणात चर्चेला आलेला इथिकल हॅकर भंगाळे याच्यावर दबाव टाकून लूटीचे काम पार पाडण्याचे नियोजन केले होते. मात्र, जळगाव पोलिसांनी त्यापूर्वीच हा सर्व धक्कादायक प्रकार उद्ध्वस्त केला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या पत्नीसोबत भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे संभाषण होत असल्याचा आरोप केल्याने चर्चेत आलेला इथिकल हॅकर मनीष भंगाळे याची पोलिसांनी या प्रकरणात मदत घेतली. दोन महिन्यांपूर्वी काही लोक हॅकर मनिष भंगाळे याच्या संपर्कात आले. ते विविध बँकांच्या खात्यांची माहिती, एटीएमकार्डचा फोटो असा डेटा देवून ऑनलाईन पद्धतीने पैसे चोरी करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते. यादरम्यान मनीष हा त्याच्या मित्रासोबत गुजरातलाही गेला होता. त्याठिकाणी काही जणांनी त्याला बँक खात्यांची माहिती, फोटो दिले. तेव्हा त्यांनी मनीषला संबंधित खातेधारकांची रक्कम ऑनलाईन चोरी करण्यास सांगितले. संशयित आरोपी हेमंत पाटील याने त्याला एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम देण्याचे आमिषही दाखविले होते. तेव्हा या प्रकरणात हेमंत पाटीलसह नगर, गुजरात, राजस्थान, नाशिक येथील दुसरे लोकही सहभागी असल्याचे भंगाळे यास कळाले. हा प्रकार खूपच धक्कादायक असल्याने मनीष भंगाळे याने 12 ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना माहिती दिली. त्यानुसार बडगुजर यांनी गोपनीय पद्धतीने माहिती काढली असता, चोरीच्या मार्गाने संबंधितांनी विविध बँकांच्या खातेधारकांची माहिती मिळविल्याचे निष्पन्न झाले. तसेच यात अनेकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यासाठी टोळी असल्याचे समोर आले. यावेळी मनीष भंगाळेचा जबाबही नोंदविण्यात आला होता.
एक हजार रुपये ऑनलाईन चोरण्याचा प्रयोग अन् त्यानंतर दोघांना अटक-
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सुरुवातीला ज्या उद्देशाने संशयितांनी बँकेचा डेटा भंगाळेला पाठविला होता, त्यानुसार संशयितांना अडकविण्यासाठी नियोजन केले. मनीष भंगाळे याच्या मदतीने संशयितांनी दिलेल्या एका बँक खातेधारकाच्या माहितीच्या आधारावर त्याचे एक हजार रुपये काढण्यात आले. यानंतर संबंधित हजार रुपयांपैकी हेमंत पाटील यांच्या खात्यावर 250 रुपये, धुळे येथील मोहसीन याच्या खात्यावर 250 रुपये तर तिसर्या एका जणाच्या खात्यावर पाचशे रुपये पाठविण्यात आले. यानंतर पैसे काढण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने मनीष भंगाळेने संशयितांना सांगितले. ऑनलाईन पद्धतीने एक हजार रुपये चोरण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संशयित आरोपी हेमंत पाटील व मोहसीन खान यांना जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानाच्या अटक करण्यात आली.
नाशिकमधील एका बँक मॅनेजरचाही गुन्ह्यात सहभाग-
याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांजवळून मिळालेल्या 6 जणांच्या बँक खात्याच्या तपशीलानुसार संबंधित खातेधारकांच्या खात्यावर एकूण 412 कोटींची रक्कम असल्याचे अनिल बडगुजर यांनी सांगितले. अशाप्रकारे देशभरातील अनेकांच्या बँकेचा डेटा संशयितांनी चोरला होता. या गुन्ह्यात आणखी 7 संशयित निष्पन्न झाले आहेत. या टोळीत नाशिकमधील एक बँक मॅनेजरचाही सहभाग आहे.