जळगाव - येथील कोविड रुग्णालयात घडलेले कोरोनाबाधित 82 वर्षीय वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक ती कागदपत्रे मागवली आहेत. या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी गुरुवारी रुग्णालयात भेट देऊन वॉर्ड क्रमांक ७ मध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तेथील काही डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि वॉर्डलेडी यांचे जबाब देखील नोंदवून घेतले.
कोरोनाबाधित वृद्ध मृत्यू प्रकरण : पोलिसांनी नोंदवले डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे जबाब - जिल्हा सामान्य रुग्णालय
भुसावळ येथील एका ८२ वर्षीय वृद्धेचा मृतदेह वॉर्ड क्रमांक ७ मधील शौचालयात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
भुसावळ येथील एका ८२ वर्षीय वृद्धेचा मृतदेह वॉर्ड क्रमांक ७ मधील शौचालयात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. वृद्धेवर उपचार सुरू असताना या वॉर्डातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि वॉर्ड लेडी यांनी उपचाराकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणा केल्यानेच वृद्धेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचे तपासाधिकारी अकबर पटेल यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. वृद्धा बेपत्ता झाल्यापासून म्हणजेच १ जून ते १० जून दरम्यान वॉर्ड क्रमांक ७ मध्ये ड्युटीवर कोण डॉक्टर्स आणि कर्मचारी होते. त्यांचे हजेरी पुस्तक देखील पोलीस निरीक्षक पटेल यांनी पडताळून पाहिले. त्याचप्रमाणे, हजेरी पुस्तकातील नोंदींची माहिती देखील तपासाच्या अनुषंगाने आपल्याकडे घेतली.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी देखल तपासाच्या दृष्टीने चर्चा केली. या प्रकरणात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्राथमिक तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सादर केला जाणार असून, त्यानंतर या प्रकरणात अटकसत्र राबवले जाऊ शकते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.