जळगाव - कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला, किराणा माल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना अशा बिकट परिस्थितीत थेट घरापर्यंत भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील दापोरी या गावातील मीतेश गुर्जर या युवकाने 'मींक्षा' नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपवर भाजीपाल्याची बुकींग केल्यानंतर काही तासातच थेट शेताच्या बांधावरून घरापर्यंत भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
कोरोना: 'मींक्षा' अॅपवरून घरबसल्या मिळेल ताजा भाजीपाला; जळगावच्या तरुणांनी लढवली शक्कल - कोरोना न्यूज
कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत थेट घरापर्यंत भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील दापोरी या गावातील मीतेश गुर्जर या युवकाने 'मींक्षा' नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपवर भाजीपाल्याची बुकिंग केल्यानंतर काही तासातच थेट शेताच्या बांधावरून घरापर्यंत भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
![कोरोना: 'मींक्षा' अॅपवरून घरबसल्या मिळेल ताजा भाजीपाला; जळगावच्या तरुणांनी लढवली शक्कल jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6550996-thumbnail-3x2-minkshajalgaon.jpg)
१५ ते २० दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ चीन पुरताच मर्यादित होता. भारतात केवळ एक-दोनच कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. अशा परिस्थितीत हा आजार भारतात वाढल्यास आणीबाणीची शक्यता निर्माण होईल, असा अंदाज दापोरी येथील बांधकाम अभियंताची पदवी घेतलेल्या मीतेश गुर्जर या युवकाला आला. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भाजीपाला पुरवणे कठीण होईल व शेतकरीही आपला माल बाजारात आणू शकणार नाहीत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही व नागरिकांनाही बिकट परिस्थितीत जीवनाश्यक सुविधा म्हणून भाजीपाला मिळेल. यासाठी एक अॅप तयार करण्याचा निर्णय मीतेशने घेतला. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात बाजारातून भाजीपाला घेताना अनेकवेळा भाजीपाल्याला अनेक ग्राहकांचा स्पर्श होतो. त्यामुळेही हा संसर्ग वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने भाजीपाल्याची खरेदी केल्यास ग्राहकांना लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात बाहेर निघण्याची गरज भासणार नाही, याच विचारातून मीतेशने हे पाऊल टाकले.
आठ दिवसात तयार केले अॅप-
जळगावातील पिंप्राळा येथील बीसीएचे शिक्षण पूर्ण केलेल्या वरुण दुसानेची मदत घेवून मीतेशने अॅप तयार करण्याची संकल्पना आखली. यासाठी आधी दापोरी परिसरातील पंचक्रोशीतील खर्ची, रवंजा या गावांमधील भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांना भाजीपाला बाजारात न जाताच थेट बांधावरून माल विक्री करण्याची संकल्पना सांगितली. शेतकऱ्यांनी होकार दिल्यानंतर, दोन्ही युवकांनी दिनेश पाटील, विशाल पाटील व मयुर गुर्जर या युवकांना सोबत घेवून शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारे 'मींक्षा' हे अॅप आठच दिवसात तयार केले. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असून, ग्राहक ऑनलाईन त्यांना हवा असलेल्या भाजीपाल्याची ऑनलाईन बुकींग करून, बाजारभावात तो भाजीपाला थेट आपल्या घरात मागवू शकतात. सध्या या अॅपची ट्रायल यशस्वी झाली आहे. मात्र, नागरिकांना त्याविषयी माहिती नसल्याने ते वापरात नाही. लवकरच त्याविषयी नागरिकांना माहिती देऊन ते कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.