जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा अक्षरशः विस्फोट झाल्याने आता ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी तब्बल 4 ते 5 पटीने वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवश्यक तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणे पुरवठादारांना अशक्य होत असून, येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.
विशेष: जळगावात 'ऑक्सिजन'अभावी गुदमरतोय रुग्णांचा जीव; रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने 'सिलिंडर'चा तुटवडा - जळगाव ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा बातमी
राज्यात कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची खुप मोठी गरज निर्माण झाली आहे. यामुळे याचा तुटवडा होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. तरीही जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 40 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. सद्यस्थितीत त्यातील 10 हजारांवर रुग्ण अॅक्टिव्ह असून, त्यांच्यावर रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. चिंतेची बाब म्हणजे, यातील सुमारे एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण हे गंभीर स्थितीतील असल्याने त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. व्हेंटिलेटर्सच्या तुलनेत ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार केला तर जिल्ह्यातील मुख्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच जिल्हा कोविड रुग्णालय, महापालिकेची रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र तसेच कोरोनासाठी अधिग्रहित केलेली इतर खासगी रुग्णालये मिळून आता जवळपास 2400 ते 2600 ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज अवघ्या 24 तासात भासत आहे. मात्र, राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मेडिकल ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून अत्यावश्यक घटक असलेल्या लिक्विड ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादकांनी मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर आवश्यक तेवढा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी 20 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा आवश्यक आहे. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यासाठी अवघा 12 ते 14 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे रिफिलिंग प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण विक्रमी संख्येने वाढत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हीच स्थिती कायम राहिली तर पुढच्या 15 दिवसात जिल्ह्यात आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी एका दिवसाला अवघ्या 350 ते 400 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. परंतु, आता परिस्थिती गंभीर झाली असून, ऑक्सिजन सिलिंडरची मागणी तब्बल 4 ते 5 पटीने वाढली आहे. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्हा कोविड रुग्णालयात युद्धजन्य परिस्थिती-
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा कोविड रुग्णालयात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत माहिती देताना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले, की कोविड रुग्णालयात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी एका दिवसाला अवघ्या 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, आता हे रुग्णालय फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव झाले असून, या रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल करण्यात येतात. रुग्णालयातील सुमारे पावणे चारशे बेड हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे आहेत. याठिकाणी एका दिवसाला प्रत्येकी 7 हजार क्षमतेचे 1200 ते 1400 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. त्यामुळे एका पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नव्हता. म्हणून दुसर्या पुरवठादाराची मदत घेण्यात येत आहे. सिलिंडरची मागणी व पुरवठा यात अटीतटीची स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे, असेही डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. ऑक्सिजन अभावी दुर्घटना घडू नये, म्हणून कोविड रुग्णालयात 'ऑक्सिजन कमिटी' स्थापन करण्यात आली आहे. अनेस्थेशिया विभागप्रमुख डॉ. संदीप पटेल आणि भांडारपाल संजय चौधरी हे कमिटीचे काम पाहत आहेत. रुग्णालयातील 6 ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडर्सची कमतरता भासू नये म्हणून ते परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेऊन आहेत. सहाही प्लांटमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक सिलिंडर्स कार्यान्वित असतात. त्यामुळे 24 तासात 1200 ते 1400 सिलिंडर्स रिकामे होतात. ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून उत्पादकांच्या संपर्कात रहावे लागत असल्याचे डॉ. संदीप पटेल यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा पुरवठा यापुढे आरोग्य यंत्रणेसाठीच -
जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्योगांसाठी पुरवला जाणारा ऑक्सिजनचा साठा यापुढे आरोग्य यंत्रणेसाठीच वापरला जाणार आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. याबाबत माहिती देताना औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या जळगावातील दोन्ही कंपन्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा केवळ रुग्णालयांना केला जात आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. परंतु, जिल्ह्यासाठी 20 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आवश्यक असताना अवघा 12 ते 14 मेट्रिक टन पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत तुटवडा जाणवत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन प्लांटमधून ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. गरज म्हणून भुसावळच्या तिसऱ्या प्लांटला उत्पादनाची परवानगी दिली आहे. तो प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा आहे. रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. भविष्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सिजनची गरज वाढणार आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या प्रधान सचिवांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय समिती स्थापन झाली आहे. या समितीत निवासी उपजिल्हाधिकारी, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय साधून नियोजन करतील. एफडीएचे सहायक आयुक्त उत्पादकांशी समन्वय व बॉटलिंग प्लांटमधून वाटप करतील. परिवहन विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी वाहतूक व टँकरबाबत समन्वय साधतील. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मागणी नाेंदवू शकणार असल्याचे डॉ. माणिकराव म्हणाले.
लिक्विड ऑक्सिजनचा भासतोय तुटवडा -
ऑक्सिजन निर्मिती प्रक्रियेतील अडचणींबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हर्षिता गॅसेस प्रा.लि.चे संचालक आशिष भंडारी म्हणाले, की जळगावात सध्या दोन कंपन्या ऑक्सिजनची निर्मिती करत आहेत. अलिकडे ऑक्सिजनला अचानक मागणी वाढली. मागणीच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी लिक्विड ऑक्सिजन कमी उपलब्ध होत आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. जिल्ह्याची गरज 2400 ते 2500 सिलिंडरची असताना अवघे 1700 ते 1800 सिलिंडरची निर्मिती होत आहे. म्हणजेच 500 ते 600 सिलिंडरचा दररोज तुटवडा आहे. सध्या केवळ आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजन पुरवण्याच्या आम्हाला सूचना आहेत. याशिवाय शासकीय गरज म्हणून भुसावळ येथील आयुध निर्माणी तसेच दीपनगरच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात ऑक्सिजन पुरवठा होत आहे. लिक्विड ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले तर रात्रंदिवस एक करून ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते, असेही भंडारी म्हणाले.