जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने बुधवारी मतदारसंघातील शक्तिकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. मात्र, आगामी निवडणुक ही राज्याची आहे. यात केंद्राचे नेतृत्त्व कामी येईल असे नाही, तेव्हा कोणीही गाफील राहू नका, अशा शब्दांत भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन मजबुतीसाठी नेत्यांनी यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ व पन्ना प्रमुख तसेच कार्यकर्त्यांचे कान टोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.