जळगाव -कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगावातील स्मशानभूमीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने बाधिताचा मृतदेह अंत्यसंस्काराअभावी तब्बल 5 ते 6 तास रुग्णालयातच पडून होता. ही घटना बुधवारी घडली असून सरकारी यंत्रणेचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. याविरोधाततीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी; जळगावातील धक्कादायक प्रकार - जळगाव कोरोना अपडेट
मृत्यूनंतर कोविड रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत व्यक्तीच्या मुलाला बोलावण्यात आले. त्याने नेरीनाका स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्काराची माहिती घेतली. तेव्हा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे 3 हजार रुपयांची मागणी केली. पीपीई कीट, लाकडे तसेच इतर साहित्य आम्हाला आणावे लागते. त्यासाठी पैसे लागतात, असे उत्तर त्या मुलाला दिले. पण, पैसे नसल्याने तो पुन्हा कोविड रुग्णालयात परत आला.
जिल्ह्यातील पाचोरा येथील एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा बुधवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोविड रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत व्यक्तीच्या मुलाला बोलावण्यात आले. त्याने नेरीनाका स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्काराची माहिती घेतली. तेव्हा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे 3 हजार रुपयांची मागणी केली. पीपीई कीट, लाकडे तसेच इतर साहित्य आम्हाला आणावे लागते. त्यासाठी पैसे लागतात, असे उत्तर त्या मुलाला दिले. पण, पैसे नसल्याने तो पुन्हा कोविड रुग्णालयात परत आला. त्याठिकाणी त्याला मृतदेह लवकर अंत्यसंस्कारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्याच्याकडे मृतदेह स्मशानभूमीत हलविण्यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेला देण्यासाठी देखील पैसे नव्हते.
हतबल झालेल्या त्या मुलाने विनवण्या करूनही त्याला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. या साऱ्या घडामोडीत कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह तब्बल 5 ते 6 तास रुग्णालयातच पडून होता. दरम्यान, या घटनेची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांना मिळाली. त्यांनी लागलीच कोविड रुग्णालयात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेत संकटात असलेल्या त्या मुलाला मदतीचा हात दिला. त्याच्या वडिलांचा मृतदेह स्मशानभूमीत हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच, अंत्यसंस्काराची देखील व्यवस्था केली. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितले जात असल्याने या प्रकारची चौकशी करावी. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी प्रतिभा शिंदे यांनी केली. या प्रकाराबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.