जळगाव -शहरात गुरुवारपासून सुरू झालेल्या नाले साफसफाईच्या कामाची पाहणी करताना स्थानिक नागरिकांना मास्क लावण्याचा सूचना दिल्याचा राग आल्याने मनपाच्या उपायुक्तांना शिवीगाळ, तर दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. शहरातील समतानगर भागात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोंडाला मास्क लावण्यास सांगितल्याने मनपा उपायुक्तांना शिवीगाळ, दोन कर्मचाऱ्यांना मारहाण - जळगाव लेटेस्ट न्युज
संबंधित व्यक्तींकडून उपायुक्तांना शिवीगाळ सुरू असताना आरोग्य निरीक्षक बडगुजर, एस. आय. कुणाल बारसे आणि मुकादम उज्ज्वल पेंडवाल यांनी मध्यस्थी करत, संबंधित व्यक्तींना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, त्या व्यक्तींनी अंगावर धावून येत बारसे व पेंडवाल या दोघांना मारहाण करून दुखापत केली.
मनपाचे उपायुक्त पवन पाटील हे आरोग्य अधीक्षक, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समतानगर भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणीसाठी गेले होते. यावेळी या ठिकाणी चार ते पाच स्थानिक नागरिक आपली तक्रार घेवून उपायुक्तांकडे आले. तक्रार मांडत असताना संबंधित व्यक्तींनी तोंडाला मास्क न घातल्याने उपायुक्तांनी संबंधितांना मास्क घालण्याचा सूचना दिल्या. उपायुक्तांनी दिलेल्या सूचनेमुळे संबंधितांना राग आला. त्यांनी उपायुक्तांना आम्ही मास्क लावणार नाही, असे सांगितले. त्यावर उपायुक्तांनी संबंधितांना मास्क घातला तरच तक्रार ऐकली जाईल, असा सल्ला दिला. त्यावर संतापलेल्या त्या पाचही जणांनी उपायुक्तांना शिवीगाळ केली.
मध्यस्थी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण -
संबंधित व्यक्तींकडून उपायुक्तांना शिवीगाळ सुरू असताना आरोग्य निरीक्षक बडगुजर, एस. आय. कुणाल बारसे आणि मुकादम उज्ज्वल पेंडवाल यांनी मध्यस्थी करत, संबंधित व्यक्तींना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, त्या व्यक्तींनी अंगावर धावून येत बारसे व पेंडवाल या दोघांना मारहाण करून दुखापत केली. यामध्ये दोघांना किरकोळ जखम झाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.