जळगाव-पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण हाेऊ नये म्हणून महापालिकेने शहरातील नाल्यांच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे. पाच मुख्य नाल्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर ७५ उपनाल्यांची साफसफाई शिवाजीनगरमधून सुरू झाली आहे. हे काम २८ मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
जळगाव महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईला सुरुवात शहरातून वाहत जाणाऱ्या पाच माेठ्या नाल्यांची लांबी २३ किलाेमीटर आहे. या पाचही नाल्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असताे. अनेकदा नाल्यांमधील घाणीमुळे तसेच अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाल्याने परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरते. त्यामुळे नागरिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर येत असतात. तसेच या पाण्यामुळे साथीचे आजार पसरून शहरात रोगराईही निर्माण होते.
दरवर्षी कमी अधिक प्रमाणात हाेणारे नुकसान लक्षात घेता यावर्षी पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची साफसफाई करून घेण्याचे नियाेजन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात होणारी धावपळ थांबवता येणार आहे. त्यानुसार पाच मुख्य नाल्यांच्या साफसफाईसाठी प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत साफसफाईची निविदा प्रसिद्ध केली जाणार असून मक्तेदारामार्फत साफसफाई केली जाणार आहे. तसेच ७५ उपनाले व माेठ्या गटारींची साफसफाईचे काम सुरू झाले आहे.
शिवाजीनगरातील दूध फेडरेशनच्या मागील भागातील नाला, मेहरूण परिसरातील लक्ष्मीनगर पिंप्राळा परिसरातील दत्त काॅलनी परिसरातील नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी महापाैर भारती साेनवणे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, प्रभाग अधिकारी विलास साेनवणी, नगरसेवक कैलास साेनवणे, रेश्मा कुंदन काळे, भाजप गटनेते भगत बालाणी, सरिता नेरकर, दिलीप पाेकळे, मयूर कापसे, विजय पाटील, अमर जैन यांनी पाहणी केली. यावेळी आराेग्य विभागातील अधिकारी संजय अत्तरदे, एस. बी. बडगुजर, जितेंद्र किरंगे उपस्थित हाेते.