जळगाव - जळगाव महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेच्या सेवानिवृत्तीचा प्रशासनाला विसर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या या महिलेस डिसेंबर-जानेवारी असा २ महिन्यांचा पगार देण्याची किमया देखील मनपा प्रशासनाने केली आहे.
जळगाव महापालिका प्रशासन आपल्या ढिसाळ कारभारामुळे कायम चर्चेत राहते. आस्थापना विभागाच्या निष्काळजीपणाचा असाच एक नमुना समोर आला आहे. सिंधू शिवदास बिऱ्हाडे या महिला महापालिकेत युनिट क्रमांक ३ मध्ये कायम सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवा पुस्तिकेनुसार त्यांची सेवानिवृत्ती नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. त्यानुसार तसा प्रस्ताव तयार करुन त्यांना निवृत्ती देण्याची जबाबदारी महापालिका आस्थापना विभागाची असते. मात्र, या विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या निवृत्तीचा प्रस्तावच तयार झाला नाही. सफाई कर्मचारी असलेल्या या महिला अशिक्षित असल्याने ही बाब त्यांच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे त्या देखील काम करीत राहिल्या.
हेही वाचा -'आमचं उष्ट कुणी खाऊ नये', औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसेवर 'सेनास्त्र'
एकीकडे त्यांना निवृत्ति करणे विसरलेल्या मनपाच्या आस्थापना विभागाने त्यांचे डिसेंबर व जानेवारी या २ महिन्यांचे वेतन देखील काढले. अखेर महिलेने मी कधी निवृत्त होणार असे विचारल्यावर त्यांच्या युनिट प्रमुखाच्या ही बाब लक्षात आली. त्याने हा प्रकार महापालिकेच्या आस्थापना विभागाच्या लक्षात आणून दिले. यानंतर, खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने या महिलेचे काम थांबविण्याची विनंती प्रमुखाला केली. त्यानतंर घाईगर्दीत या महिलेच्या निवृत्तीचा प्रस्ताव तयार करुन ४ दिवसांपूर्वी त्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे आस्थापना विभागासह संपूर्ण मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी -
या सर्व प्रकारामुळे कुठलीही चुक नसतांना देखील सफाई कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनासाठी प्रत्येक विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्यास उशीर लागत असल्याची माहितीही अखिल भारतीय मजदूर संघाचे जिल्हध्यक्ष अजय घेंगट यांनी दिली. तसेच याप्रकरणी चौकशी करून संबधितांवर कारवाईची करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हेही वाचा -पाणीपुरवठा मंत्री म्हणतात.. बिअरबार, परमिट रुमची जोड दिल्याशिवाय हॉटेल चालत नाही