जळगाव -शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असतोष निर्माण झाला आहे. यासाठी मागील महासभेत रस्ते दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. या निधीतून होणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या निविदांना मंजुरी दिली आहे.
महापालिका स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायीची ऑनलाइन सभा पार पडली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, नगर सचिव सुनील गोराणे, उपायुक्त संतोष वाहुळे, प्रशांत पाटील व मुख्य लेखा अधिकारी कपिल पवार आदी उपस्थित होते. स्थायी समितीसमोर एकूण आठ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. सर्व विषयांना या सभेत मंजुरी मिळाली. सभेच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा व भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्थायीची ऑनलाइन सभा तहकूब करून, प्रत्यक्षात सभागृहात सभा घेण्याची विनंती केली. नाशिक महानगरपालिकेत अशाप्रकारे सभा होत असल्याचेही नितीन लढ्ढा यांनी सांगितले. त्यावर यापुढे अशाप्रकारे सभा घेण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी दिली. या सभेत जळगाव शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या निविदांना मंजूरी देण्यात आली.
...तर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई