जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे गाळ्यांचा भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. अनेकवेळा नोटिसा देवून देखील थकीत रकमेचा भरणा न केल्याचे महापालिका प्रशासनाने आज (गुरुवारी) सकाळपासून गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. दुपारी २ वाजेपर्यंत पथकाद्वारे पोलीस बंदोबस्तात २७ गाळे सील करण्यात आले. दरम्यान, कारवाई फक्त आमच्याच गाळ्यांवर का? असा प्रश्न उपस्थित करत काही गाळेधारकांनी कारवाई पथकातील अधिकाऱ्यांजवळ संताप व्यक्त केला.
महापालिका मालकीच्या फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या 950 गाळेधारकांना ८१ 'क'च्या नोटिसा बजावून ११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. त्यातील काही गाळेधारकांनी रक्कमा भरल्या होत्या. मात्र, वारंवार नोटिसा देवून देखील काही गाळेधारकांनी एकही रुपयाचा भरणा केलेला नव्हता. थकबाकी असलेल्या गाळेधारकांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पुन्हा गाळे सील कारवाईचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी सकाळपासूनच महात्मा फुले मार्केटमध्ये या कारवाईला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दोन पथकांच्या माध्यमातून गाळे सील कारवाईला सुरुवात झाली.
हेही वाचा - आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले
यात प्रभाग अधिकारी विलास सोनवणे आणि अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या नेतृत्त्वात तसेच किरकोळ वसुली विभागाचे अधीक्षक नरेंद्र चौधरींच्या उपस्थितीत १४ आणि १३ गाळ्यांची यादी तयार करून सकाळी साडेअकरा वाजेपासून गाळे सील करण्यास सुरुवात झाली. यात शहर पोलीस ठाण्यासमोरील महात्मा फुले मार्केटमधील तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील गाळे मालासह सील करण्यात आले. यावेळी गाळेधारकांनी प्रशासनाच्या कारवाईला विरोध नसला तरी एवढे दुकाने असताना आमचीच दुकाने का सील करत आहेत?, पहिल्या क्रमांकाच्या गाळ्यापासून कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी दुकानांचा वीजपुरवठा बंद करून पंचनामा करून महापालिकेची कुलूपे लावून गाळे सील लावण्यात आले.