महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक विमा कंपन्यांची मुजोरी थांबवा; आमदार चंद्रकांत पाटलांचे कृषी मंत्र्यांना साकडे - insurance company rule for Banana crop insurance

जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी केळी पीक विम्याचा लाभ घेतात. मात्र, पीक विम्याच्या असलेल्या जाचक अटी व निकषांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही.

कृषीमंत्र्यांसोबत आमदार पाटील यांची बैठक
कृषीमंत्र्यांसोबत आमदार पाटील यांची बैठक

By

Published : Sep 8, 2020, 8:28 PM IST

जळगाव - पीक विम्याची रक्कम भरूनही जाचक निकष आणि अटींमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांची मुजोरी थांबवावी, अशी मागणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसेंची भेट घेऊन पीकविमाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची देशभरात ओळख आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी केळी पीक विम्याचा लाभ घेतात. मात्र, पीक विम्याच्या असलेल्या जाचक अटी व निकषांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, याची कोणीही दखल घेतली नाही. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत कृषीमंत्र्यांची भेट घेतली. केळी पीक विम्याचे जाचक निकष आणि केळी पिकावर आलेल्या सीएमव्ही व्हायरसच्या नियंत्रणाबाबत त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करत योग्य तो मार्ग काढण्याची मागणी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. मुक्ताईनगर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या. सीएमव्हीमुळे नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना धीर देण्यासाठी, संबंधित कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली. दरम्यान, कृषी मंत्र्यांनी पीक विम्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आमदार पाटील यांना आश्वासन दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांना योग्य तो परतावा मिळवून देईल, असेही कृषीमंत्र्यांनी यावेळी आमदार पाटील यांना आश्वस्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details