जळगाव -'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते', अशी शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कोकणातील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करताना कानाखाली लगावण्याची भाषा केली होती. राणेंच्या या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
हेही वाचा -नारायण राणेंची भाषा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान - नवाब मलिक
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
नारायण राणेंना लक्ष्य करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, तरीदेखील ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यांना काय बोलावे? याचे भान नसेल तर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे. ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा माहिती असायला हवी. पण तरीदेखील ते असे वक्तव्य करत आहे. त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये फक्त दाखल करायला नको, तर शॉकसुद्धा द्यायला हवेत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीपदी ही ते होते. त्यांच्याप्रमाणे शरद पवार, विलासराव देशमुख हेदेखील मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळातही विरोधी पक्ष होते. मात्र, त्या विरोधी पक्षांना एक प्रतिष्ठा होती. मात्र, नारायण राणे हे प्रतिष्ठा नसलेले भूत आहे. त्यांच्या अंगात चुडेल घुसली की काय? असे मला वाटते. त्यांना एखाद्या भानामतीच्या भक्ताकडे नेऊन त्यांच्या अंगात काय घुसले आहे ते पाहिले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -Video : 'मी असतो तर कानाखालीच मारली असती', उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणेंची जीभ घसरली
ते माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत -
नारायण राणे यांनी सरकारवर टीका निश्चित करावी. कामाच्या बाबतीत किंवा सरकारचे ज्या ठिकाणी अपयश आहे, त्या ठिकाणी टीका करायला हरकत नाही. परंतु, ते बेताल वक्तव्य करत आहेत. मला त्यांची कीव येते. त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ते माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.