जळगाव - महापालिकेच्या पुढील अडीच वर्षासाठीच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईला जाहीर झाली. यामध्ये जळगाव महापालिकेचे महापौरपद हे महिला खुल्या गटासाठी राखीव झाल्यामुळे महापालिकेत पुन्हा महिलाराज कायम राहणार आहे. महापालिकेत ७५ नगरसेवकांपैकी एकूण ४२ नगरसेविका असून, यामध्ये ३४ नगरसेविका भाजपच्या आहेत. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षासाठी महापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
राज्यातील २७ महापालिकेच्या महापौरपदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात जाहीर करण्यात आली. विद्यमान महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपणार आहे. त्यामुळे आता मार्च २०२१ मध्ये महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीला महापौर सीमा भोळे, सभागृह नेते ललित कोल्हे हे उपस्थित होते. सध्या महापालिकेतील महापौरपद ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे २००३ नंतर यंदा देखील महापालिकेत पाचही वर्ष महिलाराज राहणार आहे.
हेही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांवर अद्यापही कारवाई नाही; महापालिका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात
२३ महिला खुल्या प्रवर्गातून विजयी
महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव झाले असली तरी २३ नगरसेविका या अधिकृतरित्या खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. यामध्ये १६ नगरसेविका या भाजपच्या आहेत. ५ नगरसेविका शिवसेनेच्या तर २ नगरसेविका या एमआयएमच्या आहेत. दरम्यान, महापालिकेत भाजपचेच बहुमत असल्याने भाजपचा महापौर होईल यात शंका नाही. मात्र, महापौरपदाची निवड करताना शक्यतो खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्याच नगरसेविकेचा विचार भाजप नेतृत्वाकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.