जळगाव - लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कापून ऐनवेळी उमेदवारी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झालेले भाजपचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हेदेखील कोट्यधीश आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे.
उन्मेष पाटील यांच्याकडे जंगम व स्थावर मालमत्ता मिळून सव्वा कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. उन्मेष पाटील यांच्याकडे २०१४ मध्ये सुमारे ७४ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता २०१९ मध्ये त्यांची मालमत्ता तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची आहे. त्यात जंगम मालमत्ता ९४ लाख ४३ हजार ६०४ रुपये तर स्थावर मालमत्ता ३१ लाख २६ हजार १०० रुपये इतकी आहे. तर पाटील यांच्यावर २५ लाख २९ हजार ९५४ रुपये कर्ज आहे. शिवाय त्यांच्याकडे ३६ लाख २ हजार १०८ रुपये किंमतीची आलिशान फोर्ड इंडिव्हर कार आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे ४० ग्रॅम व पत्नीच्या नावे २५० ग्रॅम सोने-चांदीचे दागिने आहेत.