जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. यावेळी नाशिक येथून नातेवाईकांच्या घरून मुळगावी जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे चोरट्याने थेट दुचाकी चोरुन प्रवास केला. या घटनेनंतर हिंमत वाढल्याने त्या चोरट्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने तीन महिन्यात दोन दुचाकी चोरल्या. दरम्यान, या तिन्ही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्यातील एक चोरटा अल्पवयीन आहे. रवींद्र शिवदास पाटील (वय २४, रा. टेहू, ता. पारोळा), गोपाल अरुण महाजन (वय २३, रा. शिव कॉलनी, पारोळा) व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
रवींद्र पाटील हा या गटाचा म्होरक्या आहे. तो पारोळ्यात एका चारचाकी दुरुस्तीच्या गॅरेजवर काम करतो. मार्च महिन्यात तो नाशिक येथे नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे रवींद्रला पारोळ्यात येण्यासाठी वाहन मिळत नव्हते. त्याने थेट अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरी केली. याच दुचाकीने तो पारोळ्याला आला. दरम्यान, पारोळ्यात आल्यानंतर त्याने गोपाल महाजन व अल्पवयीन मुलगा या दोन्ही मित्रांना दुचाकी चोरीची स्टोरी सांगितली. तेव्हापासून तिन्ही मित्रांनी मिळून दुचाकी चोरी सुरू केली असून गेल्या तीन महिन्यात त्यांनी आणखी दोन दुचाकी चोरल्या आहेत.