जळगाव -जिल्ह्यातील गोद्री या गावात दोन गटात हाणामारी व दंगल झाल्यानंतर एक ३० वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, हे सर्व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे. हा तरुण कुटुंबीयांच्या संपर्कात असून सहा महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील एका जंगलात लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणाला आज ताब्यात घेतले. देवानंद प्रभाकर कोळी (वय ३०, रा. गोद्री, ता. जामनेर) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न -
कोळी कुटुंबीयांचे गोद्री गावातील दुसऱ्या एका कुटुंबाशी भांडण झाले होते. यातून हाणामारी देखील झाली. यानंतर ३० एप्रिल २०२० पासून देवानंद हा गावातून बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पहुर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. देवानंदसोबत घातपात झाला आहे. दुसऱ्या गटातील लोकांनी त्याचे अपहरण करून खुन केला आहे, असे आरोप त्याचे कुटुंबीय करत होते. कोळी कुटुंबीय गावातील काही लोकांवर संशय घेत होते. त्यामुळे पोलीस संशयितांची चौकशी करत होते. कोळी कुटुंबीयांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांवर दबाव वाढत होता.
अशी झाली कारवाई -
देवानंद हा वाघेरा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे त्याच्या सासुरवाडीजवळ एका जंगलात लपुन बसला होता. तो सासुरवाडी व कुटुंबीयांच्या देखील संपर्कात होता. मात्र, त्याचे कुटुंबीय पोलिसांची दिशाभुल करून सातत्याने त्याचा शोध घेण्यासाठी दबाव आणत होते. दरम्यान, देवानंद हा जालना जिल्ह्यात लपून बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन व भगवान पाटील यांच्या पथकाने भोकरदन तालुक्यात त्याचा शोध सुरू केला. देवानंद हा वाघेरा परिसरात असल्याची माहिती मिळताच आज सकाळी पोलीस पथकाने जंगलात त्याचा शोध घेतला. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीसाठी देवानंदला पहुर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.