जळगाव -कोरोनाची तीसरी लाट सुरू झाली असून पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतरही नागरिकांमध्ये कोरोनासंबंधी नियमावलीची जनजागृती करावी लागत आहे. ही जनजागृती करताना जळगावच्या केर्हाळे कुटुंबीयांनी चक्क आपल्या कन्येच्या विवाह पत्रिकेतून कोरोनाविषयक जनजागृती केली आहे. त्यांनी पत्रिकेतून सर्वांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. यातून ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्हाळे यांनी समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
पत्रिकेविषयी माहिती देताना केऱ्हाळे कुटुंब हेही वाचा -Pune Police in Jalgaon : मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : गाडीभर कागदेपत्रे घेऊन पोलीस पुण्याला रवाना
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर राज्य शासनाचे निर्बंध कठोर होत असताना लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमांवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मर्यादा घातली. मात्र, नियोजित असलेले लग्न कसे टाळता येणार म्हणून मर्यादित पाहुण्यांमध्ये काही विवाह सोहळे पार पडत आहेत. अशात माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिल केर्हाळे यांची कन्या निकिता हिचा विवाह चेतनसोबत पाच फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. यासाठी केर्हाळे यांनी अत्यंत कल्पकतेने लग्न पत्रिका तयार केली असून ही अनोखी व आदर्श लग्नपत्रिका सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
अशी आहे लग्नपत्रिका
लग्न पत्रीका सुटसुटीत असून त्यावर डाव्या बाजूला विवाह सोहळ्यासंबंधी माहिती, वधू - वरांची नावे, विवाहाचा दिवस, मुहूर्त, स्थळ दिलेले आहे. मात्र, सर्वात वरच्या बाजूला मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखण्याबाबत आवाहन हाच या पत्रिके मागचा उद्देश आहे. याच बाजूला तळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्राची प्रतिमा आहे. पत्रिकेच्या उजव्या बाजूला लसीकरणाबाबत आवाहन करणारे "तुमचे लसीकरण हाच आमचा आहेर" त्यामुळे लशीचे दोन्ही डोस जरूर घ्या, असा भावस्पर्शी मजकूर या लग्नपत्रिकेत आहे. या आदर्श पत्रिकेबाबत अनिल केर्हाळे व त्यांच्या पत्नी शारदा केर्हाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही केले कौतुक
ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्हाळे यांच्या कन्येच्या विवाहची लग्न पत्रिका घेऊन जिल्हाधिकार्यांना आमंत्रित करण्यासाठी गेले असता राऊत यांनी केऱ्हाळे कुटुंबीयांचे कौतुक केले. या कौतुकात स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केर्हाळे कुटुंबीयांना एक शुभेच्छापर पत्र देखील दिले. एक चांगला संदेश आपण लग्नपत्रिकेत छापल्याने नक्कीच या संदेशाचा पुरेपूर फायदा सर्वजण घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत जिल्हाधिकारी राऊत यांनी अभिनंदन करीत केर्हाळे याचे कौतुक केले.
हेही वाचा -Pune Police Team in Jalgaon : मराठा विद्या प्रसारक संस्था वाद प्रकरणी पुणे पोलिसाकंडून जळगावात चौकशी सुरू