जळगाव - लॉकडाऊनच्या काळात शहरातील आर. के. वाईन शॉप तसेच त्याच्या गोदामांमधून मद्यतस्करी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जळगाव शहरासह जिल्हाभरातील वाईन शॉप संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने जळगावातील रामेश्वर कॉलनीतील राज वाईन शॉपची चौकशी केली. लॉकडाऊनमध्ये या शॉपमधूनही मद्याची तस्करी झाल्याचा संशय आहे. या शॉपमधील मद्यसाठ्याची पडताळणी सुरू आहे. त्यात काही तफावत आढळली तर शॉप मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन्स शॉप तसेच त्याच्या गोदामातून लॉकडाऊनच्या काळात मद्यतस्करी सुरू होती. याची कुणकुण लागल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे या शॉपवर छापा टाकला होता. त्यावेळी वाईन शॉप मालकासह काही कर्मचारी एका चारचाकीतून मद्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पुढे धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मद्यतस्करीत पोलीस अधिकाऱ्यासह काही कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाला होता.